Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

48 तासांत युतीचा निर्णय घ्या,अन्यथा प्रचाराला सुरुवात करू : शिवसेना

मुंबई (प्रतिनिधी) एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे महाआघाडीत रूपांतर करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेमधील युतीबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. नेत्यांच्या पातळीवर चर्चा सुरू असली, तरी युतीच्या आराखड्याबाबत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळेच येत्या 48 तासांत युतीला अंतिम स्वरूप द्या, अन्यथा आम्ही आमच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करू असा अल्टिमेटम शिवसेनेने भाजपाला दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपामधील युतीचे भवितव्य काय ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, निवडणूक तोंडावर आली तरी, युतीचे घोडे चर्चेच्या फडातच अडले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकमेकांच्या संपर्कात आहेत, दुसरीकडे भाजपा-शिवसेनेचे दोन वरिष्ठ मंत्री हे युतीसाठीची चर्चा करीत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे भाजपा केंद्रीय नेतृत्वाच्या वतीने चर्चेत सहभागी होत आहेत. युती करण्यासाठी शिवसेनेने तीन अटी ठेवल्या आहेत. त्यात पालघरची जागा शिवसेनेला द्यावी तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागांचेही वाटप व्हावे. दुसरी अट अशी की, शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा. (उदा. नाणारचा तेलशुद्धीकरण प्रकल्प रद्द करणे ) आणि तिसरी अट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी, या अटींचा समावेश आहे. मात्र, यापैकी एकाही अटीला अद्याप भाजपाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.

युतीला अंतिम स्वरुप देण्यात आले असून त्यात भाजपाला लोकसभेच्या २५ व शिवसेनेला २३ जागा, तर विधानसभेच्या १४५ जागा भाजपा तर १४३ जागा शिवसेना लढणार असल्याची चर्चा होती. मात्र दोन्ही बाजूंकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. पालघरची जागा सोडण्याचीही भाजपाची तयारी नाही. मात्र, मोदी वा शहा यांच्यापैकी एकजण येत्या काही दिवसांत मातोश्रीवर जाऊन युतीसाठी शिवसेनेचा हात मागेल, असे मानले जाते. आम्ही या मुद्यावर युतीचा निर्णय घेतला, हे शिवसैनिकांना पटण्यासारखी बाब भाजपाकडून मान्य झाल्याशिवाय शिवसेना युतीला होकार देणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version