सावदा येथील स्वामी श्री वासुदेवचरणदासजी यांचे निधन

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथील माजी पुजारी परमपूज्य स्वामी श्री वासुदेवचरणदासजी यांचे आज शुक्रवार, दिनांक २५ मार्च रोजी संध्याकाळी ४.३० वाजता आजारामुळे दुःखद निधन झाले.

गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे समस्त स्वामी नारायण  सत्संग समाज व सर्व खान्देश सत्संग समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे बालपण यावल तालुक्यातील ‘चिखली’ या गावी व्यतित झाले. खान्देश विभागातील विद्वान शास्त्री स्वामी कृष्णस्वरूपदासजी यांचे ते शिष्य होते. पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांनी संप्रदायात प्रवेश केला व आपले गुरुवर्य शास्त्री स्वामी कृष्णस्वरूप दासजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वामिनारायण संप्रदायाची दीक्षा घेतली. तेव्हापासून ते संन्यस्त जीवन जगू लागले .

श्री स्वामीनारायण मंदिर, यावल येथील सुंदर व भव्य मंदिर निर्माण कार्य त्यांनी आपल्या हयातीत पूर्ण केले. संप्रदायात सत्संगाच्या विविध प्रकल्पांमध्ये, समारंभांमध्ये ते प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यरत असत. त्यांच्या जाण्याने समस्त स्वामिनारायण सत्संग समाज दुःखी झालेला आहे. प्रभू श्री स्वामिनारायण भगवान त्यांना चिरशांती प्रदान करो यासाठी सर्व प्रार्थना करीत आहेत.

उद्या शनिवार, दि.२६ मार्च २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता ‘वडताल’ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Protected Content