Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : यावल तालुक्यातील कुपोषीत आदिवासी बालकाचा मृत्यू

जळगाव/यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील वड्री जवळच्या आदिवासी वस्तीवर राहणार्‍या एका कुपोषित बालकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्याचे प्रयत्न सुरू असतांना या बालकाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील वड्री धरण येथील आदिवासी वस्तीमधील आकाश जवानसिंग पावरा (वय-आठ महिने) हा बालक गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. आज शनिवार ३१ जुलै रोजी पहाटे सहा वाजता त्याची प्रकृती अत्यंत खालावली. त्यामुळे त्याला त्याच्या पालकांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात डॉ. अक्षय नालगे यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली असता बालक कुपोषीत असून त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. त्याला श्वास घेण्यासही खूप अडचणी येत होत्या असे त्यांना आढळून आले. परिणामी वैद्यकीय अधिकारी यांनी बालकाला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले.

या अनुषंगाने शासकीय रूग्ण वाहिकेने बालकाला सकाळी १० वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बालकाला येथील बालरोग तज्ञ डॉ. अतूल गाजरे यांनी तपासणी केली. यातच बालकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी बालकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले. दरम्यान, तालुक्यातील कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी दुजोरा दिला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे यावल येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १३ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत कुपोषणग्रस्त बालकांची आकडेवारी विचारली होती. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकासच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची अक्षरश: भंबेरी उडाली होती. यावल तालुक्यातील ३१६ कुपोषणग्रस्त तर ३९ बालके कमी जास्त वजनाची बालके असल्याचे समोर आले होते. ही आकडेवारी पाहून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दोन्ही अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. यानंतर आज तालुक्यात कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version