Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेकायदेशीर भरतीची मान्यता रद्द करा; जिल्हा परिषद शिक्षण विभागासामोर उपोषण (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील आदर्श हायस्कूलमध्ये झालेली बेकायदेशीर भरती रद्द करण्यात यावे. तसेच यातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी जळगाव जिल्हा परिषदेच्या समोर उपशिक्षकाचे सहकुटुंबाचे बेमुदत आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली.

 

माजी शिक्षक उपशिक्षक संदीप शिरसाठ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील आदर्श माध्यमिक विद्यालय व हायस्कूलमध्ये बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात आले होते. यासंदर्भात शाळेचे उपशिक्षक संदीप शिरसाठ यांनी सदरील बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करून या प्रक्रियेची पूर्णपणे चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे १२ नोव्हेंबर रोजी केली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांच्या दालनात १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. त्यात सांगण्यात आले की, नियमानुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे व कर्मचाऱ्यांचे नेमणूका करण्याचे अधिकार संबंधित संस्थेला असल्यामुळे सदर संस्थेने ३० दिवसांच्या आत भरती प्रक्रियेची संपूर्ण कागदपत्रे सादर करावे व शाळेत केलेली भरती ही नियमानुसार आहे की नाही याबाबत याची पुराव्यासह कार्यालयास व संबंधित तक्रारदारास खात्री पटवून द्यावे, भरती प्रक्रिया नियमानूसार नसेल तर संस्थेने संबंधित कर्मचाऱ्यांच्या केलेल्या नेमणूका रद्द कराव्या व याचा अहवाल ६० दिवसांच्या आत कार्यालयात सादर करावे, अश्या सुचना जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी मुख्याध्यापकासह शाळेच्या संस्थाचालकांना दिले होते. दिलेल्या ६० दिवसांचा कालवधी पुर्ण होवूनही अद्यापपर्यंत कोणता अहवाल शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला नाही.

 

दरम्यान, प्रक्रियेत काहीतरी देवाण-घेवाण असल्यामुळे निर्णय घेण्यास जिल्हा परिषद प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी तक्रारदार माजी उपशिक्षक संदीप प्रल्हाद शिरसाट रा.मांडळ ता. अमळनेर यांनी न्याय न मिळत असल्यामुळे सहकुटुंब सहपरिवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात समोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version