Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलायम यांच्या घरातच ‘यादवी’ ! : सूनबाई जाणार भाजपमध्ये

लखनऊ वृत्तसंस्था | सत्ताधारी भाजपमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षाची वाट धरली असतांना आता मुलायम सिंह यादव यांच्या सूनबाईच भारतीय जनता पक्षात दाखल होणार असल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. यात गेल्या काही दिवसात भाजप सोडणार्‍यांच्या संख्येत वाढत होत असतांना आता समाजवादी पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात, अशी बातमी आहे. याची पुष्टी झाली नसली तरी याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

अपर्णा यांनी २०१७ ची निवडणूक लखनऊ कँटमधून लढवली होती. भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र अपर्णा सातत्याने पीएम मोदी आणि सीएम योगी यांचे कौतुक करत होत्या.

सपा संस्थापक मुलायम सिंह यांचे जवळचे मित्र हरी ओम यादव यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अपर्णा यादव या मुलायम सिंह यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले होते तेव्हाच त्या भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली होती. आता भाजप अपर्णा यादव यांना लखनऊच्या कँट विधानसभेतून उमेदवार बनवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि अपर्णा यादव यांच्याकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नुकतेच तीन कॅबिनेट मंत्री आणि आठ आमदारांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. यानंतर आत भाजपने थेट मुलायम यांच्या घरातच फूट पाडल्याची तयारी केल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

Exit mobile version