Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुऱ्हे पानाचे येथे नुकसानीचे पंचनामे सुरू ; रास्‍ता रोको आंदोलन स्‍थगित

WhatsApp Image 2019 11 04 at 7.26.47 PM

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे अवकाळी पावसामुळे ज्वारी,कपाशी, मका,सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही महसूल विभागाकडून कार्यालयात बसून पंचनामे करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पडला. त्यानंतर ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच महसूल प्रशासन नरमले व त्यांनी पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आज सोमवार ४ ऑक्टोबर रोजी मंडळ अधिकारी सतीश इंगळे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत तलाठी प्रवीण मेश्राम, भुसावळ सातारा भागाचे तलाठी एम. एल. रत्नाची, ग्राम विकास अधिकारी पी. टी. झोपे आदींनी पंचनामे करण्यास प्रारंभ केला. यावेळी माजी ग्रा.पं.सदस्य सुभाष पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासू वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, किशोर वराडे, जितेंद्र नागपुरे यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. शासनानेही पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र अधिकाऱ्यांच्या वेळकाढू व अकार्यक्षमपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित रहातील की काय ? अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ग्रा.पं.माजी सदस्य सुभाष पाटील, सरपंच रामलाल बडगुजर, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, उपसरपंच वासू वराडे, ग्रा.पं.माजी सदस्य किशोर वराडे , जितेंद्र नागपुरे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्यात यावे व एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही , याची काळजी घ्यावी. यासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र रस्ता रोको आंदोलन करण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी यशस्वी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करण्यात यश मिळवले. कर्मचाऱ्यांमध्ये वाढ केल्यामुळे आंदोलकांचे समाधान झाले. त्यामुळे रस्ता रोको आंदोलनाचा प्रसंग टळला.यावेळी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्यासह एएसआय शिवदास हिरे, पोहेकॉ. युनुस शेख, प्रवीण पाटील, अजय माळी, महिला पोलीस कर्मचारी राणी परदेशी, राहुल महाजन, आर.सी.पी. प्लाटूनसह होमगार्ड यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. दरम्यान ,५६५ शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले असुन ४१५ शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे अद्याप बाकी असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण होतील,असा विश्वास मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version