Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दादाकी कहानी, शिवसेनाको हजम नही हुई…!

download 13

मुंबई, वृत्तसंस्था | “शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. त्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला” असे राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सांगितले होते. अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यावरून शिवसेनेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. “अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल, तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, “दादा, कुछ तो गडबड है!,” असा प्रश्न शिवसेनेने अजित पवारांनाच केला आहे.

 

शिखर बँक घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. २७ सप्टेंबरला ते जाणार होते. पण, ईडीने चौकशी गरज नसल्याचे सांगितल्यानंतर पवारांनी आपला निर्णय रद्द केला. या घटनेनंतर काही तासांतच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांनी राजीनामा देण्यामागची कारणे पत्रकार परिषदेत सांगितली. मात्र, अजित पवारांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य केले आहे.

“निवडणुका वगैरे आल्या की, राजकारणात वावटळी उठत असतात. शरद पवार यांनी महाराष्ट्रात अशीच एक वावटळ उठवून दिली. वावटळीचे रूपांतर वादळात होईल, असे वाटत असतानाच पुतणेसाहेब अजित पवार हे आधी अचानक अदृश्य झाले, आमदारकीचा राजीनामा दिला व दुसऱ्या दिवशी प्रकट होऊन त्यांनी आपल्या अदृश्य होण्यामागची कहाणी पत्रकारांना सांगितली. अजित पवारांनी हे सर्व त्याच दिवशी अचूक वेळ साधून का केले? काकांचे एक वीररस नाटय़ राज्यात रंगात असताना मध्येच विंगेत घुसून पडदा खाली पाडून स्वतःचे दुसरे नाटय़ त्याच रंगमंचावर घडविण्याची त्यांना इतकी घाई का झाली होती? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

अजित पवार यांना हुंदका फुटला हे खरेच. आम्हीही माणसेच आहोत व आम्हालाही भावना असल्याचे वचन त्यांनी सांगितले. शरद पवारांचे नाव आले म्हणून व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर ही व्यथा त्यांनी इतरांना का नाही सांगितली? दुसरे असे की, राजीनाम्याआधी चार दिवसांपासून ते विधानसभा अध्यक्षांच्या संपर्कात होते व त्यांनी राजीनामा देण्याची वेळ नक्की केली होती. जर त्यांनी शरद पवार यांच्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल तर त्या संघर्षाच्या दिवशी ते पवारांबरोबर कुठेच दिसले नाहीत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते पाहिल्यावर वाटते, “दादा, कुछ तो गडबड है!,” असं शिवसेनेने म्हटले आहे.

Exit mobile version