Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज सकाळी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक सुरू झाली. याप्रसंगी गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख बिपीन रावत, सीआरपीएफचे महासंचालक भटनागर आदींसह तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार यात ताज्या स्थितीची आढावा घेऊन आगामी रणनिती ठरविण्यात आली. यात पाकला अद्दल शिकवण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात पाकसोबत करतारपूर साहिब कॉरिडॉरबाबत सुरू असणारी चर्चा थांबविण्याच्या निर्णयावरही चर्चा झाली. सुमारे ५५ मिनिटांपर्यंत ही बैठक चालली.

तर दुसरीकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी प्रत्येक शहिदाच्या कुटुंबाला २५ लाख रूपयांची शासकीय मदत जाहीर केली आहे. शहिदांचे बलीदान व्यर्थ जाणार नसल्याची प्रतिक्रियादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच उत्तरप्रदेशातील प्रत्येक पोलीस स्थानकांमध्ये सकाळी साडेदहा वाजता दोन मिनिटांचे मौन पाळले जाणार आहे.

Exit mobile version