Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यावर अवकाळी पावसाचे संकट…

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचे सावट निर्माण झालं आहे. राज्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. दरम्यान, यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे.

सोमवारी संध्याकाळी राज्यातल्या तुरळक ठिकाणी गडगडाट झाल्याचं माहिती समोर येतेय. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तसंच दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातल्या अवकाळी सावटामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसंच कोकणातल्या आंब्यावरही परिणाम होण्याची भीती आहे.राज्यात अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण होण्यामागचं कारण की, मराठवाड्यापासून तमिळनाडूच्या अंतर्भागापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. आज आणि उद्या म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे गडगडाट, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येत्या गुरुवारी याच परिसरात हलक्या सरी होण्याचीही शक्यता आहे.

 

कोल्हापूर, सातारा येथेही उद्यापर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटाची शक्यता आहे. तर सोलापूर, सांगली, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथेही आज तुरळक ठिकाणी गडगडाटाची शक्यता वर्तवली आहे.

 

Exit mobile version