Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशांतर्गत किकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा यंदाचा मोसम रद्द होण्याची शक्यता असून याबाबत लवकरच घोषणा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

देशातील स्थानिक क्रिकेट मोसमच रद्द करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या वर्षी रणजी, दुलीप, देवधर, विजय हजारे, सी. के. नायडू, सय्यद मुश्ताक अली या महत्त्वाच्या स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत. यामुळे क्रिकेटमध्ये करीअर करू पाहणा़र्‍या असंख्य युवा क्रिकेटपटूंचे एक वर्ष वाया जाणार आहे. तसेच स्पर्धाच न झाल्यामुळे खेळाडू, कोचेस, सपोर्ट स्टाफ, ग्राऊंडस्मन, सामनाधिकारी, पंच यांच्या मानधनावरही फरक पडण्याची भीती यावेळी निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या काळात स्पर्धांचे आयोजन करायचे म्हटल्यास बीसीसीआयला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पहिल्यांदा राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, त्यानंतर त्या राज्यांतील महानगरपालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार तसेच त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे रणजी, दुलीप यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया संघांतील खेळाडूंसह इतर व्यक्तींच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागणार. या सर्वांचीच प्रवास व राहण्याची व्यवस्था करणे हे कठीण काम असेल. त्यामुळे बीसीसीआय या स्पर्धाच रद्द करण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ऑगस्ट महिन्यात सर्व संलग्न संघटनांना पत्राद्वारे रणजी तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या दोन स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असे कळवले होते. मात्र कोरोनामुळे स्थानिक मोसम खेळवण्याची जोखीम बीसीसीआय पत्करणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version