Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेसीएलमध्ये कोझी कॉटेज स्ट्रायकर्सला विजेतेपद

जळगाव प्रतिनिधी । जेसीएल टी २० च्या ग्रॅण्ड फायनलमध्ये मॉटेल कोझी कॉटेजने खान्देश ब्लास्टर्सचा पराभव करत जेसीएलचा पहिला विजेता होण्याचा सन्मान पटकवला. खान्देश ब्लास्टर्सचा संघ उपविजेता ठरला.

अंतिम सामन्यामध्ये धारदार गोलंदाजी करणारा ओम मुंडे सामनावीर तर तनेश जैन हा मालिकावीर ठरला. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे रतनलाल सी. बाफना यांच्या सहकार्याने आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या जळगाव क्रिकेट लीग अर्थात जेसीएल टी२० ची आज ग्रॅण्ड फायनल होती. विजेत्या संघाला जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते जेसीएल चषक प्रदान करण्यात आला. यावेळी सर्व प्रकाश चौबे, सागर चौबे, रमेशदादा जैन, दीपक चौधरी, प्रितम रायसोनी, महेंद्र कोठारी, आनंद कोठारी, नंदलाल गादीया, विवेक देसाई, किरण बच्छाव मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या मॉटेल कोझी कॉटेज स्ट्रायकर्स संघाला चषक व ३ लाख रुपयांचे पारितोषीक देण्यात आले. तसेच उपविजेत्या खान्देश ब्लास्टर्स संघाला ट्रॉफी व १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. याशिवाय खेळाडूंवरही बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. इमर्जिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट म्हणून ओम मुंडेचा सन्मान करण्यात आला. तसेच त्याला जैन स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे दत्तक घेण्यात आले. दाल परिवार यांच्याकडून जेसीएलला प्रायोजक म्हणून मिळालेली १ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारताच्या वीर जवानांसाठी देण्यात आली. जेसीएलच्या संपूर्ण मालिकेमध्ये ३४४ चौकार व १५१ षटकारांची आतिशबाजी झाली.

गेल्या सहा दिवसांपासून जेसीएल टी२० चा थरार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे रंगलेला होता. आयपीएलच्या धर्तीवर आयोजित केलेली इतक्या मोठ्या स्तरावरील मालिका पहिल्यांदाच संपन्न असल्यामुळे जेसीएल चा पहिला विजेता कोण होईल? याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. जेसीएल टी२० ला बेन्झो केम, सातपुडा ऑटोमोबाईल, आय केअर ऑप्टिकल, कांताई नेत्रालय, दाल परिवार, पगारिया बजाज, मकरा एजन्सीज, कोठारी ग्रुप नमो आनंद, फ्रुटुगो, हिरा रोटो पॉलिमर्स, भंडारी कार्बोनिक यांचे सहकार्य लाभले होते. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजवरून याला लाईव्ह प्रक्षेपणासह व्यापक प्रसिध्दी देण्यात आली.

सामना संपल्यानंतर जेसीएल टी२० साठी सहकार्य करणार्‍या ऑफिशिअल्सचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संदीप चव्हाण, संदीप गांगुर्डे, वैभव हलदे, गुणलेखक पंकज पाटील, महंमद फजल गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अनुराग महेता यांचा सत्कार करण्यात आला.

खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

मालिकावीर तनेश जैनला पगारिया बजाज तर्फे विवेक जोशी यांनी प्लसर मोटारसायकलची चावी देऊन गौरविले. तसेच क्रिकेट कीटही देण्यात आले.
अंतिम सामन्याचा सामनावीर – ओम मुंडे
मालिकावीर – तनेश जैन
उत्कृष्ट यष्टीरक्षक – जितेंद्र नाईक
उत्कृष्ट गोलंदाज – ओम मुंडे (पर्पल कॅप देऊन सन्मान)
उत्कृष्ट फलंदाज – शुभम नेवे (ऑरेंज कॅप)
इमार्जिन प्लेअर ऑफ टुर्नामेंट – ओम मुंडे (जैन स्पोर्ट अ‍ॅकॅडमीने दत्तक घेतले)
फेअर प्ले टीम अवॉर्ड – वनीरा ईगल्स व स्पेक्ट्रम चॅलेंजर्स यांना संयुक्तपणे देण्यात आला.

ग्रॅड फायनला टॉस जेडीसीएचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या हस्ते झाला. यावेळी खान्देश बास्टर्सचे रमेशदादा जैन व मॉटेल कोझी कॉटेज संघाचे प्रकाश चौबे हे उपस्थित होते. खान्देश ब्लास्टर्स टॉप जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १८.३ षटकांमध्ये खान्देश ब्लास्टर्सचा संघ सर्वबाद ८९ धावाच करु शकला. त्यात शितल कौतुलने सर्वाधिक २३ धावा केल्या. मयुरेश चौधरी १७ तर वकार शेख याने १४ धावांचे योगदान दिले. मॉटेल कोझी कॉटेज संघातर्फे आमिर खानने २.३ षटकांमध्ये ९ धावा देत ३ गडी बाद केले. ओम मुंडेने ४ षटकांमध्ये २४ धावा देत ३ गडी बाद केले. तसेच शशांक अत्तरदेने ४ षटकात फक्त १५ धावा देत २ गडी बाद केले. तसेच संकेत पांडे व दिलीप विङाकर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

९० धावांचे माफक लक्ष घेऊन फलंदाजी करणार्‍या मॉटेल कोझी कॉटेज संघाने १२.१ षटकात ९३ धावा करुन लक्ष पूर्ण केले व जेसीएल टी २० चा चषक आपल्या नावावर केला. ८ गडी राखून त्यांनी हा अंतिम सामना जिंकला. सचिन पटेलने २४ चेंडूमध्ये १ चौकार व ३ षटकांच्या मदतीने ३१ धावा केल्या. गणेश लोहारने २७ चेंडूमध्ये ४ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. खान्देश ब्लास्टर्स तर्फे वकार शेख व धवल हेमनानीने प्रत्येकी १ गडी बाद केला. जेसीएलचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांनी जेडीसीएचे अध्यक्ष अतुल जैन यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद देशपांडे यांनी केले.

Exit mobile version