Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात दोघांवर कोविशील्ड लसीची चाचणी

पुणे वृत्तसंस्था । पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आज दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली, अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना करोना लसीचा डोस दिला. आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर हा डोस देण्यात आला.

लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेन्नर इन्स्टिटयूटने ही लस बनवली आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ या ब्राण्डनेमखाली ही लस दिली जाणार आहे. ब्रिटीश-स्वीडीश औषध कंपनी अस्त्राझेनेकासोबत सिरमने देशात एक अब्ज लसीचे डोस बनवण्याचा करार केला आहे.

तीन ऑगस्ट रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सिरमला फेज २ आणि ३ ची मानवी चाचणी घेण्याची परवानगी दिली. भारतात एकूण १७ वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची मानवी चाचणी होणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेतर्फे चालवले जाणारे परेलमधील केईएम हॉस्पिटल आणि मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर हॉस्पिटलचा समावेश आहे.

Exit mobile version