Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना कोर्टाचा दिलासा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात सध्या सशर्त जामीनावर असलेले गिरीश दयाराम चौधरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे.

पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला असून यातच गिरीश चौधरी हे कारागृहात होते. ते माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करतांना मुंबईत राहण्याचे निर्देश दिले होते. तथापि, जावई गिरीश चौधरी यांनी पुणे येथे जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मुंबई सत्र न्यायालयात ऍड. मोहन टेकवडे यांच्यामार्फत अर्ज केला होता.

या अर्जावर आज अतिरिक्त न्यायाधीश आर. एन. रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी चौधरी यांना कामानिमित्त पुणे येथे जायचे असून न्यायालयाने त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी ऍड. टेकवडे व ऍड. काजोल म्हात्रे यांनी न्यायालयाकडे केली. यासोबत, काही कागदपत्रे आणण्यासाठी चौधरी यांना त्यांच्या गावी जळगाव येथे जाण्याची परवानगीही देण्याची विनंती वकिलांनी केली. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी त्यांचा हा अर्ज मंजूर केला. यामुळे गिरीश चौधरी यांना न्यायालयाने दिलासा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, हा अर्ज मंजूर करतानाच मुंबईबाहेर जाण्यापूर्वी एक लाख रुपये कोर्टात हमी म्हणून जमा करावेत, जामिनाच्या अटी-शर्ती पाळाव्यात तसेच १२ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहावे अशा अटी घातल्या आहेत

Exit mobile version