Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दलीत वस्ती सुधार कामांमध्ये भ्रष्टाचार- राजू सूर्यवंशी यांचा आरोप

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दलीत वस्ती सुधार कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी आज दि.२ ऑगस्ट रोजी वरणगाव रस्त्यावरील संभाजी नगरातील त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत दलीत वस्ती सुधार योजनाच्या कामांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये दलित वस्तीची ४० टक्के कामे करून ६० टक्के निधी हडप केला जात आहे. काही कामे तर न करताच पैशांचा अपहार होत आहे.तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये ही साखळी संगनमताने सुरू आहे. यात बीडीओ सुध्दा सहभागी असल्याचा आरेप त्यांनी केला.

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, टेंडर घेण्यासाठी नमुना ७ नंबरची पावती फाडल्या नंतरच कामाचे टेंडर भरता येते. मात्र सदर पावती पुस्तक ठेकेदारांच्या घरी असतात. संगनमताने २-३ कंत्राटदार तालुक्यातील सर्व दलित वस्ती सुधार योजनेची कामे घेत आहे. याबाबत विचारणा केली असता असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्रामसेवकाचे दप्तर ठेकेदाराच्या घरी का?असा प्रश्‍न उपस्थित करून राजु सुर्यवंशी यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येईल तसेच तालुक्यात ग्रामपंचायतींना ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच सरकारने जर दलित वस्ती सुधार योजनेच्या बोगस कामांची चौकशी केली नाही तर रिपाइं आपल्या पध्दतीने रस्त्यावर आंदोलन करेल व त्यास जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही राजु सुर्यवंशी यांनी याप्रसंगी दिला आहे.

या पत्रकार परिषदेला नगरसेवक रवी सपकाळे, गिरीश तायडे, बाळू सोनवणे, पप्पु सूरडकर, राहूल बिर्‍हाडे,अप्पा ठाकरे, प्रविण मेहरे, जुम्मा शहा, मनोज शिंपी, युसूफ शेख आदी उपस्थित होते.

Exit mobile version