कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग होणार सुरू !

 

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने कोरोनामुक्त असलेल्या भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची घोषणा केली असून याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था घेणार असून यासाठीची नियमावली देखील प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीनं त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीचे वर्ग सुरु करणेबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. तसेच यासाठी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे.

याच्या अंतर्गत कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीत खालील मुद्यांचा समावेश आहे.

१) शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखावी. तसेच शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावे.

सॅनिटायझर, जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची – स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्‍चित करावी.

एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे. क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी कोविड- १९ साठीची चाचणी करावी.

वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर म्हणजे फिजीकल डिस्टन्सींगच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

Protected Content