Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत ! -प्रकाश आंबेडकर

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “कोरोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत,” असा खळबळजनक दावा केला आहे.

कोरोनामुळे ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं असून देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येचे नवनवीन विक्रम होत आहेत. अशातच प्रकाश आंबेडकरांनी ‘बीबीसी मराठी’ या वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केलाय.

‘धार्मिक स्थळं खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “सरकारला कोरोनाविषयी काहीही कल्पना नाही, असं मला वाटतं. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागत आहे. आज मंदिरं उघडा, यासाठी आंदोलन केलं. हे शासन कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. कोरोना आहे, यावर माझा विश्वास नाही,”

यावेळी ‘कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी, ”जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एकादिवशी होणारच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात, पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. कोरोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत,” असं उत्तर दिलं.

”करोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का, की करोनामुळे मृत्यू झाला आहे?” असे प्रतिप्रश्नही आंबेडकर यांनी उपस्थित केले.

Exit mobile version