Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षण संस्था व शाळेत समन्वय आवश्यक : ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । आज मराठी शाळांसमोर पटसंख्या आणि गुणवत्ता जोपासण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. शिक्षण संस्था आणि शाळेत समन्वय असल्यास ही आव्हाने सहजपणे पार करता येतात. भादली येथील रूरल एज्युकेशन सोसायटीने आपल्या आजवरच्या वाटचालीतून हेच सिध्द केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते रूरल एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिपल बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील हे होते.

तालुक्यातील भादली येथील रूरल एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेष पाटील, जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, पं. स. सदस्या जागृती चौधरी, सरपंच मिलिंद चौधरी, उपसरपंच अरुण सपकाळे, गटशिक्षण अधिकारी सतीश चौधरी, तुषार महाजन, वि का.सोसायटी चे चेअरमन किरण रडे,  दूध डेअरी चेअरम मनोहर महाजन, छगन खडसे, आबा कोळी, सुभाष महाजन विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालभवन गीत मंचाच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आणि यानंतर रूरल एज्युकेशन संस्थेच्या अमृत महोत्सवाचे दीप प्रज्वलन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे सेक्रेटरी सुनिल नारखेडे यानी ७५ वर्षाच्या कालावधीत संस्था व शाळा यांनी केलेल्या वैशित्यपूर्ण कार्याचा आढावा विशद केला. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते शाळेतील प्रोजेक्टर रूमचे उदघाटन करण्यात आले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, संस्थेचे कार्य हे अतिशय कौतुकास्पद असून आपण खासदार निधीतून संस्थेला शैक्षणिक साहित्य मिळवून देऊ. संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या शाळांप्रमाणेच आज मराठी शाळांच्या माध्यमासमोर खूप मोठे आव्हान आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रमाण वाढत असल्याने विद्यार्थी टिकवण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे हे आव्हान असतांना दुसरीकडे गुणवत्ता कायम राखणेही करावे लागत आहे. भादली येथील रूरल एज्युकेशन सोसायटी या संस्थेने आजवर आपला लौकीक जपला आहे. गुणवत्ता कायम राखत प्रगती करण्याचे काम संस्थेने केले आहे.

आपण शिक्षणात यथातथाच होतो. मात्र शिक्षण होण्याची संधी चालून आली होती. तथापि, शाळेतील शिक्षण होण्याऐवजी राजकारणातील मास्तर झालो. तर, अंगच्या कलागुणांमुळे आपण कलाकार देखील होऊ शकलो असतो. मात्र असे देखील न होता आपण राजकारणातील कलाकार झालो असे पालकमंत्री म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. भादली रूरल एज्युकेशन सोसायटीने आपल्या विद्यालयातील शिक्षणाचा दर्जा कायम राखला असून शाळेला मदतीसाठी आपण कटीबध्द असल्याचे अभिवचन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. तर संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.

या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा नारखेडे, यांनी केले. तर आभार संजय ठाकूर सर यांनी मानले.

Exit mobile version