Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखंडित विजेसाठी वीजबिल भरून सहकार्य करा – ऊर्जामंत्री  

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यातील ग्राहकांना महावितरण अखंडित वीजपुरवठा करत आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांनीही वीजबिल भरून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

रावेर तालुक्यातील चिंचाटी-सावखेडा बु. येथे शुक्रवार, दि.13 मे रोजी महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास आ.शिरीशदादा चौधरी, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि. प.सदस्य सुरेखा पाटील, पं.स.सदस्य प्रतिभा बोरोले, शेखर पाटील, सरपंच लता पाटील, बेबीबाई बखाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले की, “कोविड काळात महावितरणचे अनेक कर्मचारी कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले. अशा काळातही महावितरणने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला. महावितरण कोळशाच्या संकटातही सुरळीत वीज देत आहे. मात्र कोळसा विकत घेण्यासाठी पैसा लागतो. रेल्वेलाही कोळसा वाहतुकीसाठी पैसा द्यावा लागतो. महावितरणला वीज मोफत मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे. शेतकऱ्यांसाठी कृषी धोरण राबवून वीजबिलांत भरघोस सवलत देण्यात आली. त्याद्वारे जमा झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून जिल्हा व ग्रामपंचायत पातळीवर विद्युत विकासाची कामे करण्यात येत आहेत. प्रस्तावित चिंचाटी उपकेंद्रामुळे या भागातील ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहकांना केवळ 500 रुपयांत वीजजोडणी देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबविण्यात येत आहे. तर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना व्याज व दंडात सवलत देणारी विलासराव देशमुख अभय योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.” असे आवाहनही ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी केले.

याप्रसंगी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी आभार मानले.

Exit mobile version