Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून वादंग : मराठा समाजबांधवांमध्ये संतापाची लाट

उस्मानाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे आरोग्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याने प्रचंड खळबळ उडाली असून यावरून समाजबांधवांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आधीदेखील आपल्या वक्तव्यांसह वर्तनाने वादाच्या भोवर्‍यात सापडलेले होते. आता उस्मानाबाद येथील कार्यक्रमातल्या एका वक्तव्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यात बोलतांना त्यांची जीभ घसरली. निवडणूक येताच मराठा समाजाला आरक्षणाची खाज सुटते असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले. तर देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाने मराठा समाजाची झोळी भरल्याचेही ते या सभेत बोलले.

तानाजी सावंत म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणावर प्रचंड टीका केली, जातीयवाद केला गेला. फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं २०१७ मध्ये मराठ्यांची झोळी भरली. मराठ्यांना नोकर्‍या मिळाल्या आणि ज्यावेळेस जनतेचा घात करून तुम्ही सत्तेत आलात तेव्हा सहाच महिन्यात आरक्षण गेलं आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. पण आम्ही आरक्षण देणार, तेही टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देणारच असं वक्तव्य सावंत यांनी केलं.

तानाजी सावंत यांनी काल रात्री हे वक्तव्य केले. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून हे वक्तव्य व्हायरल होताच प्रचंड खळबळ उडाली असून त्यांच्यावर टिकेची मोठी झोड उठविली जात आहे.

Exit mobile version