दिलासा : २ ते १८ वर्षे वयोगटासाठी कोरोनाच्या लसीला मंजुरी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशभरात लसीकरणाला गती आलेली असतांना आज केंद्र सरकारने २ ते १८ वयोगटासाठीच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. कोव्हॅक्सीन ही लस आता मुलांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लहान मुलांच्या लसीला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता २ वर्षावरील मुलांना कोरोनाची लस मिळणार आहे.  अमेरिका, सिंगापूर यांच्यासह जगभरातील २० देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीची ३ टप्प्यात चाचणी घेण्यात आली. सप्टेंबरपर्यंत ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली होती. यानंतर आता केंद्र सरकारने २ वर्षावरील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस देण्यास मंजुरी दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. या अनुषंगाने भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनफ लसीची मुलांवरील मानवी चाचणी नागपुरात घेण्यात आली होती. २ ते १८ वयोगटांतील जवळपास १७५ मुलांवर ही चाचणी झाली. कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी २ ते ६, ७ ते १२ आणि १३ ते १८ या तीन वयोगटांत विभागणी करून घेण्यात आली होती. दिल्लीच्या एम्समध्येही लहान मुलांवर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या चाचणीचे रिपोर्ट आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आले. त्यानंतर आता या लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

 

Protected Content