Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस म. गांधींच्या नावाचा वापर करुन सहिष्णू असल्याचे खोटे चित्र निर्माण करतेय : डॉ. सरोदे

yaval

यावल प्रतिनिधी । भाजपला असहिष्णू ठरविणारा काँग्रेस पक्ष महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर करून सहिष्णू असल्याचे खोटे चित्र निर्माण करत असून काँग्रेसने हुतात्मा बापू वाणी यांना ठरवून लक्ष्य करुन आंदोलनात मारण्यात आले. काँग्रेसच्या असहिष्णूतेचा बळी हुतात्मा बापू वाणी ठरल्याचा आरोप डॉ. अतुल सरोदे यांनी केला आहे. शहरातील दत्त मंदिरात हुतात्मा बापू वाणी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.

यांनी केले प्रतिमेचे पूजन
आजच्या पिढीला पूर्वजांच्या बलिदानाचा इतिहास कळला पाहीजे. असेही डॉ. सरोदे म्हणाले. प्रसंगी व्यासपीठावर डॉ. अतुल सरोदे यांचे सह ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, माजी आमदार हरीभाऊ जावळे, डॉ.जी.टी. महाजन या मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बापू वाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बापू वाणी यांचे धाकटे बंधू अंबादास वाणी यांनी हुतात्मा बापू वाणी यांचा जनसंघातील तत्कालीन संघर्ष उपस्थितांसमोर मांडला.

या मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके म्हणाले, की जनसंघाचे तत्कालीन स्वयंसेवक हुतात्मा बापू वाणी यांचे नावाने केवळ चौक नामकरण करण्यापेक्षा आजच्या युवा पिढीला त्यांच्या कार्याची व बलिदानाची ओळख व्हावी, म्हणून त्यांचे स्मारक होणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी यावल व फैजपूर पाकिकेत ठराव आवश्यक आहे. आणि हिच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल. असे प्रतिपादन बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले.  डॉ. फडके पुढे म्हणाले, की आंदोलने आपण विसरत चाललो आहे. धारदार आंदोलन होण्याची गरज आहे.

माजी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले, की हुतात्मा बापू वाणी यांनी आंदोलनातून त्यांचे विचार प्रगट केले. देशासाठी अभिप्रेत असलेले काम त्यांनी त्यावेळी केले. जनसंघाच्या माध्यमातून विचार प्रगल्भित झाले. त्यांचे विचार त्यांचे काम आपणास आज स्फूर्ती देत आहेत.
प्रसंगी किशोर कुलकर्णी, बाळकृष्ण गणू वाणी, गोपालसिंग पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंडू माळी, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाकांत फेगडे, वसंत भोसले, बबलू घारु, भालचंद्र सराफ, राजू श्रावगी, निलेश गडे, किरण कुमार वाणी, रमेश सोनवणी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन किशोर कुलकर्णी यांनी केले.

Exit mobile version