Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऐतीहासीक ठरणार कॉंग्रेसची महारॅली ! : नाना पटोले

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कॉंग्रेसच्या स्थापना दिनी येथे आयोजीत करण्यात आलेल्या महारॅलीची तयारी पूर्ण झाली असून ही महारॅली ऐतीहासीक ठरणार असल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते येथे आज पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर यावर्षी नागपूरच्या ऐतिहासिक भूमित महारॅलीने साजरा केला जात आहे. कॉंग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे ही नागपूर व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. है तैयार हम महारॅलीमुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंकाजी गांधी, कॉंग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, कॉंग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना असून मेळाव्याची सर्व तयारी झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, नाना पटोले पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर १९२० मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी १९४७ मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच १९५९  मध्ये इंदिराजी गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात कॉंग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस साजरा होत आहे ही कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्वाची व आनंदाची बाब आहे.

याप्रसंगी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएमवर लोकांमध्ये संशय आहे, त्याची दखल निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. लोकांना वाटते त्यांचे मत दुसर्‍या पक्षाला जाते त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे ही जर लोकांची मागणी असेल तर त्याची दखल केंद्र सरकारने व निवडणुक आयोगाने घेतली पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच नरेंद्र मोदी ईव्हीएमला विरोध करत होते.

या पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतिश चतुर्वेदी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version