Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे संपन्न

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. जागा वाटपाच्या चर्चा सुरु असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. महाराष्ट्रात मविआ व देशात इंडिया आघाडी मजबूत असून काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री तसेच सीडब्ल्यूसी सदस्य, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या तिघांवर वंचित बहुजन आघाडी व इतर मित्र पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे, अशी माहिती प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

प्रदेश काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक धुळे येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एस. टी. विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, पद्माकर वळवी, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुवा, आमदार शिरिष चौधरी, आमदार लहु कानडे, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, शोभा बच्छाव, अण्णासाहेब श्रीखंडे, युवराज करंकाळ, विनायक देशमुख, अनिल पटेल, प्रवक्त्या हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष शाम सणेर आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला १० वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही केवळ ‘मन की बात’ करत असतात. मोदी सरकार केलेल्या कामावर बोलणे अपेक्षित आहे. पण ते मंदिर-मशीद या धार्मिक मुद्द्यावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम करत आहेत. खासदार राहुल गांधी यांनी मात्र देश जोडण्याचे अभियान सुरु केले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेनंतर मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा सुरु केलेली आहे, या न्याय यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा महाराष्ट्रात धुळे नंदूरबार जिल्ह्यातून प्रवेश करणार आहे. न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपा बिथरला आहे म्हणून यात्रेवर हल्ले केले जात आहेत, राहुल गांधींवर टीका केली जात आहे, असेही चेन्नीथला म्हणाले.

Exit mobile version