Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म.प्र.तील काँग्रेस आमदाराचा सी.ए.ए.ला पाठींबा

mla hardeep dang

मंदसौर, वृत्तसंस्था | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला काँग्रेसचा विरोध असतानाच, पक्षाचे मध्य प्रदेशातील आमदार हरदीप सिंह डांग यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याकडे राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)पेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

काँग्रेसचे आमदार हरदीप सिंह डांग हे मंदसौर जिल्ह्यातील सुवासरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचा या कायद्याला विरोध होत असताना, एका काँग्रेस आमदाराने या कायद्याचे समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘जर आपण नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी हे वेगळे आहेत या दृष्टीकोनातून पाहिले तर, त्यात गैर काय आहे.

पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानमधील पीडित नागरिकांना येथे चांगल्या सुविधा मिळत असतील तर त्यात काय वाईट आहे. पण जे लोक पिढ्यानपिढ्या भारतात राहतात, येथे लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्याकडे एनआरसी अंतर्गत कागदपत्रे मागितली जात आहेत, यावर विचार व्हायला हवा,’ असे आमदार डांग म्हणाले.

काही लोक सीएए आणि एनआरसी या दोन वेगळ्या गोष्टी एकाच चष्म्यातून बघत आहेत. संपूर्ण राजकारण या मुद्द्यावर केंद्रीत झाले आहे, असेही डांग म्हणाले. दरम्यान, यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनीही केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले होते.

Exit mobile version