Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉंग्रेसची अवस्था रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी ! : शरद पवारांची टीका

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका करून त्या पक्षाची दशा ही एखाद्या रया गेलेल्या हवेलीच्या जमीनदारासारखी असल्याचा टोला मारला आहे.

मुंबई तकच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. याचबरोबर, कॉंग्रेसच्या नेतेमंडळीमध्ये अजून अहंकाराची भावना आहे का?, असा प्रश्न विचारल्यावर पवारांनी एक उदाहरण देत सांगितलं की, मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.

यावरच पवारांना म्हणजे कॉंग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? असं विचारण्यात आलं. तेव्हा पवार म्हणाले, तितकं काही मी म्हणत नाही. एकेकाळी कॉंग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, कॉंग्रेसची आज दूरवस्था झालीय, असं असलं तरी हा आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. कॉंग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज कॉंग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले.

 

Exit mobile version