Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईत काँग्रेसचा मोर्चा : नाना पटोले

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेसने ३१ मार्चपासून आंदोलनाचा सप्ताह सुरु केला असून या आंदोलनाचा एक भाग म्हणून ७ तारखेला मुंबईत मोर्चा काढून आवाज उठवला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “केंद्रातील भाजपा सरकार दररोज इंधन दरवाढ करत आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जिवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या महागाईविरोधात जनतेत तीव्र असंतोष असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसने हे आंदोलन हाती घेतले आहे. ३१ मार्चपासून देशभर विविध पद्धतीने आंदोलन केले जात आहे, राज्यातही आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला या आंदोलनाची समाप्ती ७ तारखेच्या मोर्चाने होईल. ७ तारखेला गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे.” या मोर्चात काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी सहभागी होतील तसेच जनतेचाही मोठा सहभाग असणार आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन पटोले यांनी केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले म्हणाले, भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने चिडीचा खेळ खेळत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही त्याच दबावतंत्राचा भाग आहे परंतु अशा कारवायांना महाविकास आघाडी घाबरणार नाही. या दबाव तंत्राविरोधात एकत्रितपणे सामना करू. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत तर भाजपा असत्याच्या बाजूने आहे.  ईडीतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची संजय राऊत यांनी तक्रार केलेली आहे. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केल्याची घोषणा सकाळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी करताच काही तासातच संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई होते यातूनच सर्व स्पष्ट होते.

मशिदीसमोर समोर स्पीकर लावून हनुमान चालीसा लावणे  हा प्रकार राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे. संविधानाने सर्वधर्म समभावाचे सूत्र दिले आहे. सर्व धर्मांना समान अधिकार दिलेले आहेत परंतु जे लोक संविधानच मानत नाहीत ते असे प्रयत्न करुन मुख्य विषयापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टिळक भवन येथे दुपारी पक्ष पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महागाईमुक्त भारत आंदोलनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, संजय राठोड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version