Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पक्षांमध्ये संघर्ष, तर ठाकरे व फडणविसांमध्ये बंद द्वार चर्चा !

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे शिवसेना व भाजपमध्ये तीव्र संघर्ष होत असतांना आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद द्वार चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कोकणात नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू असताना,  मुंबईत वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी आज सह्याद्री अतिथीगृहात ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर एक बैठक बोलावली होती. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले आणि फडणवीस-ठाकरेंमध्ये १० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी दोन्ही पक्षातील विसंवादानंतर प्रमुख नेत्यांमधील सुसंवाद चर्चेचा विषय बनला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपवर तोफ डागली. मात्र त्यांचा संपूर्ण रोख इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांवर होता. त्यांचा उल्लेख राऊतांनी बाटगे असा केला. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शिवसेना आणि भाजपच्या वाढत्या संघर्षाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर २०१४ मध्येदेखील अशीच परिस्थिती होती. युती तुटली होती. दोन्ही बाजूला अशीच कटुता होती. मात्र त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार राज्यात आलं. आता शिवसेना-भाजप आमनेसामने आल्यानं कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाले हसून मजा बघत आहेत. आता मजा येईल म्हणून असं त्यांना वाटतंय. मात्र तसं होईल याची खात्री देता येत नाही, असं उत्तर पाटील यांनी दिलं.

 

Exit mobile version