Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रंगभूमी दिनानिमित्त परिवर्तनतर्फे चर्चासत्राचे आयोजन

WhatsApp Image 2019 11 05 at 9.05.24 PM

जळगाव, प्रतिनिधी | रंगभूमी सशक्त व जीवंत ठेवण्याची जबाबदारी कलावंतांसोबत रसिकांचीही जबाबदारी असून जळगावची रंगभूमी जीवंत आणि प्रवाही ठेवण्याचं कार्य परिवर्तन करत आहे म्हणून कलावंतांच्या व कलेच्या पाठीशी उभे राहणे ही प्रेक्षक व कलेविषयीची आस्था म्हणून आपली जबाबदारी आहे असं मत जळगावच्या विविध कार्यक्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने परिवर्तनतर्फे आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्त परिवर्तन जळगाव संस्थेतर्फे ” मला दिसलेली मराठी रंगभूमी” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्राचार्य एस. एस. राणे यांनी सांगितले की, सर्वसामान्य विषय घेऊन नाटक केले गेले पाहिजे आणि नाटकाला अनुकूल असं पर्यावरण निर्माण करण्यासाठी शोध घेतला गेला पाहिजे. कलावंतांनी समाजाचे प्रश्न आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि वेगळ्या प्रकारचे नाटक रंगमंचावर आणावे जेणेकरून सर्वसामान्य माणूस हा कलेशी जोडला जाईल ,हे विचार मांडले. तर महापालिका स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी सांगितले की, कलेचे महत्त्व ओळखण्यासाठी मातृभाषा ही अतिशय महत्त्वाची आहे. सर्वसामान्य माणसाला कलेकडे वळवण्यासाठी आजच्या नवीन पिढीला भाषेचे उत्तम ज्ञान ही प्राथमिक गरज असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. नंदलला गादिया यांनी सांगितले की, परिवर्तनच्या माध्यमातून जळगावातील कला आणि सांस्कृतीक क्षेत्र हे विस्तारत आहे. त्यामुळे मला अनेक नवीन चांगल्या गोष्टी पाहता आल्या, शिकता आल्यात याचा आनंद आहे. उत्तम उपक्रम हे परिवर्तनच्या माध्यमातून होतात आणि ते जळगावची रंगभूमी सशक्त करत असल्याचे मत गादिया यांनी मांडले. प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. रवी महाजन यांनी आपल्या पाल्याला त्याच्या आवडीचे क्षेत्र निवडून दिले पाहिजे , कलावंत म्हणून नाट्यगृहात होणारे प्रयोग जर वाढीला लागले तर कलेला उत्तम दिवस येऊ शकतात. बदलत्या माध्यमांमुळे यावर उपाय म्हणून वेगवेगळे वेगवेगळी माध्यमं कलावंतांनी आणि परिवर्तन सारख्या संस्थांनी पुढाकार घेत रसिकांना जोडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात असून सुद्धा माझ्यातला रसिक हा जिवंत आहे हे परिवर्तन संस्थेच्या विविध सांस्कृतिक उपक्रमानेमुळे समृद्ध होणारी गोष्ट आहे. प्रसिद्ध उद्योजक अनिल कांकरिया यांनी सांगितले की, रंगभूमी समाजाचा आरसा समाजाला सुसंस्कृत करणार हे माध्यम आहे. पण या माध्यमाला व्यवस्थापनाचं व्यवस्थापनाची जोड मिळाली तर जळगावची रंगभूमी ही बलशाली होऊ शकते आणि मी आणि माझी संस्था परिवर्तन सारख्या संस्थेच्या विविध उपक्रमांच्या पाठीशी उभे राहू असं मत अनिल कांकरिया यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी नवीन पिढी नाटकाकडे वळले पाहिजे तसेच मुलांना नाटकाची गोडी लागावी यासाठी आपण सर्व मिळून काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध उद्योजक गनी मेमन यांनी सांगितले की, रंगभूमी माणसाचं दुःख हलकं करायला मदत करते खरेच समाजसेवक हे रंगभूमीवरील कलाकार आहेत जळगाव शहरात नाटक साहित्य यामाध्यमातून परिवर्तने कलेचे क्षेत्र जिवंत ठेवले. परिवर्तन संस्थेच्या पाठीशी आम्ही सर्व उभे राहू अशी ग्वाही गनी मेमन यांनी दिली.शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांनी रंगभूमी म्हणजे सगळ्या कलांचा समुच्चय असून शालेय स्तरावर मी नाटकांमध्ये काम केलं. पण क्रीडा क्षेत्रात यश मिळवल्यानंतर जेव्हा मी नाट्यक्षेत्राकडे वळून बघते तेव्हा माझ्यातला खेळाडू विकसित करण्यासाठी एक शक्ती म्हणून मला नाट्य क्षेत्राची खूप मदत झाली असे स्पष्ट केले. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल ॲड. शुचिता हाडा यांचा सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नाट्य कलावंत शंभू पाटील, पियुष रावळ, होरिलसिंग राजपूत , सुदिप्ता सरकार, प्रा. राजेंद्र देशमुख, विनोद रापतवार, नारायण बाविस्कर यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर कार्यक्रमाला राहूल निंबाळकर, शितल पाटील, राजू बाविस्कर, हर्षदा पाटील, हेमंत काळुंखे, विनोद पाटील, किशोर पवार आदी उपस्थित होते.

Exit mobile version