Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मतांची स्पर्धा; सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सर्वसामान्य जनतेत मतदानाबाबत जनजागृती करणे, तसेच विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना व सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धामध्ये जनसंज्ञापन, वृत्तपत्रविद्या तसेच सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 

याबाबत माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर म्हणाले की, या स्पर्धेत ध्वनी चित्रफित, जाहिरात निर्मिती, पोष्टर अर्थात भित्तीपत्रक आणि घोषवाक्य या तीन प्रकारात स्पर्धा होणार आहे. या तीनही स्पर्धाचे विषय आणि नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

या स्पर्धेचे विषय युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार असणार आहे. तीनही स्पर्धाचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक एक लाख, दुसरे पारितोषिक ७५ हजार, तिसरे पारितोषिक ५० हजार रुपये आहे. दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी दहा हजार रुपयांची असणार आहे. भित्तीपत्रक स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक ५० हजार, दुसरे पारितोषिक २५ हजार, तिसरे पारितोषिक दहा हजार रुपये असणार आहे. दोन उत्तेजनार्थं पारितोषिके प्रत्येकी पाच हजार असणार आहे. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक २५ हजार, दुसरे पारितोषिक १५ हजार, तिसरे पारितोषिक १० हजार आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी पाच हजार रुपयांची आहेत.

 

जिल्ह्यातील पत्रकारीता मास मिडिया संबंधित तसेच कला शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version