Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बंजारा समाजबांधव अतिशय कष्टाळू असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील रामदेववाडी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ८३ लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.

 

या कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत, पेव्हींग ब्लॉक, भूमिगत गटर, व्यायामशाळा, शाळा वॉल कंपाऊंड, डांबरीकरण, इलेक्ट्रीक पोल व डीपी आदी कामांचा समावेश असून यातील काही कामांचे भूमिपुजन तर काहींचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी संत सेवालाल सभागृहासाठी १५ लक्ष रूपयांचा निधी देण्याची घोषणा दिली. तर गावकरी आणि समाजबांधवांनी एकजुट ठेवून प्रगती पथावरून वाटचाल करावी असे आवाहन देखील केले.

 

तालुक्यातील रामदेववाडी येथील कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होते. तर या कार्यक्रमाला शिवसेनेचे जि. प. सदस्य पवन सोनवणे , जिल्हा उपसंघटक नरेंद्र सोनवणे, दक्षता समिती सदस्य अर्जुन पाटील, माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील , रो.ह.यो.चे  तालुकाध्यक्ष रवींद्र कापडणे,  शिरसोली मा. सरपंच अनिल पाटील, उपसरपंच हुका राठोड, माजी सरपंच उदय चव्हाण, संतोष राठोड,  दिपक राठोड,  राजेश राठोड,  गोपीचंद चव्हाण,  सुनील राठोड, देविदास राठोड, परिसरातील सरपंच उपसरपंच तसेच रामदेव वाडी येथील शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थ मार्फत फटाक्यांची   आतिषबाजी करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले .पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांनी  संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील राजेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले.

 

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गावातील विविध कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. यात शाळा वॉल कंपाऊंड -१० लक्ष, शाळा दुरूस्ती १० लक्ष, पेव्हींग ब्लॉक ०३ लक्ष, भूमिगत गटार बांधकाम ०५ लक्ष, व्यायामशाळा ०८ लक्ष, ग्रामपंचायत कार्यालयव २० लक्ष, गावांतर्गत डांबरीकरण १३ लक्ष, गावात इलेक्ट्रीक पोल व डीपी १४ लक्ष आदी एकूण  ८३ लक्ष रूपयांच्या कामांचा समावेश होता. याच कार्यक्रमात गावातील  ५२ कुटुंबांना १२ अंक क्रमांकाच्या रेशनकार्ड वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, रामदेववाडी हे गाव बंजारा समाजबहुल गाव असून येथे विविध विकासकामांना गती देण्याचा देण्याचा आपला प्रयत्न आहे. या गावात आजवर अनेकविध कामे करण्यात आली असून आगामी काळातही कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या तरूणाईला देखील मोलाचा सल्ला दिला. उच्च शिक्षण घेऊन तरूणांनी गावांचा लौकीक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. गावात संत सेवालाल सभागृहासाठी १५ लक्ष रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा ना. गुलाबराव पाटील यांनी केली. तर, गावातील सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षता समितीचे सदस्य अर्जुन पाटील यांनी केले तर आभार शिवसेनेचे गोपीचंद चव्हाण यांनी मानले.

Exit mobile version