Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी | पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने बैठक घेऊन रस्ते दुरूस्तीच्या निर्देशांचे आजपासून पालन सुरू झाले आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये आजपासून रस्ते दुरूस्तीस प्रारंभ झाला आहे. 

याबाबत वृत्त असे की, शहराच्या बर्‍याच भागांमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली असून काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने बांधकाम खात्याची बैठक घेतली. यात महापालिका आयुक्तसतीश कुलकर्णी, शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, प्रभाग अधिकारीसंजय पाटील, मनीष अमृतकर, योगेश वाणी, प्रकाश पाटील, मिलिंद जगताप यांच्यासह बांधकाम अयंते यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत महापौर आणि उपमहापौरांनी रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश दिले. यात प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजण्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी तातडीने यावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.

या अनुषंगाने आज सकाळपासून शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने भजे गल्ली, मेहरूण आदींसह अन्य भागांचा समावेश आहे. तर या संदर्भात बांधकाम खात्याशी संपर्क साधला असता आजपासून रस्ते दुरूस्ती सुरू झाली असून सोमवारपासून या कामांना वेग येणार असल्याचे सांगितले.

या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, जळगावकर नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. खराब रस्त्यांची तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीने बैठक घेऊन यावर निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याच प्रमाणे शहरातील विकासकामांना गती देण्यात येणार असून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

 

Exit mobile version