Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या जीवनात कर्तृत्वाला स्थान दिले. प्रतिकुलतेत देखील केवळ कर्तृत्वाच्या जोरावर आनंदाने जगत, काव्य निर्मिती करत राहिल्या हे खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक वा.ना. आंधळे यांनी केले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त दिनानाथ चौधरी, स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी यांच्यासह वाड्यातील नागरीक उपस्थित होते.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. आंधळे व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वा.ना. आंधळे यांचे पुस्तक व सुतीहार देऊन हृद्य स्वागत केले. लेवा गणबोली दिनाच्या औचित्याने कवयित्री शीतल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लेवा गणबोली व मराठीच्या इतर भागांमध्ये बोलण्यात येणाऱ्या भाषा या बहिणी बहिणी आहेत. त्या त्या भागाची ओळखच या बोली भाषा देत असतात. या सर्व बोली भाषा जीवंत कशा असतील याबाबत विचार करायला हवा. बहिणाबाई शिवाय लेवागणबोली ही पूर्ण होऊच शकत नाही असे अस्सल लेवा गणबोलीतून त्यांनी मनोगत व्यक्त केले. जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

यावेळी कवयित्री ज्योती राणे, शीतल शांताराम पाटील तसेच अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पाटील, सोनार, वाघ, गाजल चौधरी, पायल चौधरी, अशोक चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास नातसून पद्माबाई चौधरी, पणती सून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, परिवारातील व चौधरी वाड्यातील नागरीक यांसह सौ. सुनंदा चौधरी शोभा चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, देवेश, शारदा, कोकिळा, दिपाली प्रिया, कविता चौधरी तसेच सुभाष मराठी, ईश्वर राणा, भानुदास नांदेडकर यांची उपस्थिती होती. ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांच्या नियोजनात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Exit mobile version