दिलासा : कोरोना रूग्णाच्या संपर्कातील असणार्‍यांना चाचणीची गरज नाही !

नवी दिल्ली प्रतिनिधी | आयसीएमआरने कोरोनाबाबत जारी केलेल्या नवीन निर्देशांमध्ये रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याची गरज नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

देशात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस झपाट्याने रुग्णवाढ होत आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून कोरोना चाचणीबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीच्या कोरोना चाचणीबाबत आता आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

आयसीएमआरच्या या निर्णयानुसार आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

होम आयसोलेशननंतर डिस्चार्ज करण्यात आलेल्या रुग्णांना किंवा कोविड सेंटरमधून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांनाही कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचं आयसीएमआरने म्हटलंय. दरम्यान, खोकला, ताप, घशात त्रास, चव किंवा वास येत नसेल आणि कोरोनाची अन्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. यातही जी व्यक्ती ६० वर्षापुढील आहे किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसात त्रास किंवा त्यासंबंधी आजार असेल तर त्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. रुग्णालयांसाठीही आयसीएमआरकडून काही निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

Protected Content