Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. एकनाथराव खडसे यांची वर्सी महोत्सवाला भेट ; घेतला संतांचा आशीर्वाद

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या वर्सीमहोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी भजन, सत्संग, महाआरती अशा विविध कार्यक्रमांनी चैतन्याचे वातावरण दिसले. सिंधी बंधू व महिलांच्या सेवाभावाच्या कृतीतून भाविकांना समाधानाची व सुखाची अनुभूती झाली

 

आज शनिवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ लोकनेते आ. एकनाथराव खडसे व माजी आ. डॉ . गुरुमुख जगवाणी ,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी , महानगर सरचिटणीस सुनिलभैय्या माळी , आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष इब्राहिम तडवी, संजय जाधव यांनी वर्सी महोत्सवात येऊन संतांचे दर्शन घेत जळगाव जिल्हा सह महाराष्ट्रासाठी सुखसमृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली व आशीर्वाद घेतले.

जळगाव शहरात पूज्य श्री अमर शहिद संत कंवरराम साहबे यांचा (६५ वा) , पूज्य सतगुरु श्री संतबाबा  हरदासराम साहबे यांचा (४५ वा) , तर बाबा गेलाराम साहेब यांचा (१४ वा) वर्सी महोत्सव अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य संत कंवरनगर सिंधी पंचायत यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे.  या महोत्सवात देशाच्या काना कोपर्‍यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. अनेक भाविकांच्या उपस्थितीत आज अखंड पाठसाहेब पठनाची समाप्ती झाली.

 

यानिमित्ताने शहरातील प्रतिष्ठान, दुकाने बंद ठेऊन सिंधी समाज बांधव या महोत्सवात हजारोच्या संख्येने सामील झाले. त्यांनी येथे भाविकांना सेवा दिली.   अनेक राज्यांतून  आलेल्या  समाजाच्या विविध मंडळांनी भजन, नाटिका असे कार्यक्रम सादर करीत विविध समाज प्रबोधनात्मक संदेश दिला.  यावेळी महोत्सवात रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आले होते. यामध्ये समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात रक्तदान ही केले.

जळगाव येथील वर्सी महोत्सव कोरोनाकाळात बंद होता.  पण यावर्षी नेहमी प्रमाणेच  स्थानिक समाज बांधवांची उपस्थिती, सेवा व विनम्रता अशा कारणांनीसुद्धा या महोत्सवाला श्रध्दा ,धार्मिक अधिष्ठान तर प्राप्त होतेच पण दया आणि सेवा हा संदेश ही मिळतो अशा भावना आलेल्या भाविकांनी आज व्यक्त केल्या. आलेल्या मान्यवरांचे अमर शहीद संत कंवरराम संस्था व पूज्य संत कंवरराम सिंधी पंचायतीच्या वतीने सत्कार करुन बाबांचा प्रसाद देऊन स्वागत केले.

 

Exit mobile version