Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात रंगली जुगलबंदी

सिंधुदुर्ग | येथील चिपी विमानतळाचा सोहळा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंदीया व नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीमंत्री नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.  नारायण राणे यांनी चिपी विमातळाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना हे टोले लगावले. ते म्हणाले की, १९९० साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो.  मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेना खासदार विनायक राऊत जोरदार टीका केली. राऊत यांनी चिपी विमानतळासह जिल्ह्यातील अनेक विकासकामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला.

नारायण राणे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे, आदळआपट करण्याचा नाही. आपलं कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याच्या विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नारायणराव आपण म्हणतात ते खरं आहे. तुम्ही जी विकासकामं केली त्यात तुमचं योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असं अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेनं तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे. हे ही खरं आहे की, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नव्हती. म्हणूनच अशी खोटं बोलणारी लोकं त्यांनी शिवसेनेतून काढून टाकली होती, हा सुद्धा इतिहास आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर पलटवार केलाय.

उध्दव ठाकरे म्हणाले की, मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा फोन केला तेव्हा दुसर्‍याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेड्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतात. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागला. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करुफ, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Exit mobile version