Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हधिकारी यांची अटी व शर्तीसह मान्यता बंधनकारक

( Image Credit Source : Live Trends News )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकरी यांच्या अटी व शर्तीसह मान्यता देण्यात येईल अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून आलेल्या परिपत्रकात दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित घटनापीठाने प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम २०१७ मधील तरतुदी आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम २०१७ मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी/शतींचे काटेकोर पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी दिलेली आहे.

यास अनुसरून अटी/शर्तीचे काटेकोर पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करावे, संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगीच बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यात येईल, राज्यात बैलगाडी शर्यत, शंकरपट, छकडी अश्या १०० मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्याच शर्यतीस परवानगी आहे, बैलगाडी शर्यत आयोजित करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी विहित नमुन्यात बँक हमी किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरुपात रु. ५०००० इतक्या प्रतिभूती ठेवीसह जिल्हाधिकारी यांच्याकडे किमान १५ दिवस आधी अर्ज करवा. बैलगाडी शर्यत आयोजनाच्या संपूर्ण कालावधीत उपस्थित राहण्यासाठी नायब तहसीलदार व पोलीस उप-निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या २ अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून प्राधिकृत करण्यात येईल, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधित शर्यतिचे आयोजन थांबविण्यास सदर निरीक्षक प्राधिकृत असतील, बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या सहभागी यांनी शर्यतीच्या अगोदर बैल/वळू यांची नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्याकामार्फत तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, शर्यत आयोजनाचे चित्रीकरण डिजिटल स्वरुपात करण्यात येईल.

नियमांचे, परवानगीच्या अटींचे उल्लंघन केल्यास अथवा शर्यती मध्ये भाग घेतलेल्या व्यक्तींची माहिती, अर्ज, बैल/वळूचे आरोग्य दाखले, आयोजनाचे चित्रीकरण सादर न केल्यास अथवा आयोजनामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास आणि त्यांची खात्री पटल्यास आयोजकांची प्रतिभूती जप्त करणे व भविष्यात अशी शर्यत आयोजित करण्यास प्रतिबंध करणे अशा स्वरुपाची कारवाई याशिवाय कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. बैलगाडी शर्यतीच्या आयोजनातील प्राण्यांचा ताबा असणारी व्यक्ती शर्यतीसंबंधी नियमांचे उल्लंघन करील किंवा प्राण्यांना वेदना किंवा यातना देईल ती व्यक्ती पाच लाख रुपये किंवा तीन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल.

जिल्ह्यात विनापरवानगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू नये तसे होत असल्याचे अथवा झाल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ शामकांत पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version