मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला ! : संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे जाहीर करत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतरच त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी अट मातोश्रीने टाकली होती. मात्र त्यांनी या ऑफरला प्रतिसाद न दिल्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातील पक्षाचे निष्ठावंत संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. यामुळे आता संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्‍वभूमिवर, त्यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

संभाजीराजे याप्रसंगी म्हणाले की, मुंबईत आल्यावर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले, आमची बैठक झाली, दोघांनीही सांगितलं की शिवसेनेत प्रवेश करा आम्ही उमेदवारी जाहीर करतो. मी स्पष्ट सांगितलं मी प्रवेश करणार नाही.  त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन करत निमंत्रित केलं आपण वर्षावर या चर्चा करू.मीही मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तिथे त्यांनी पहिला मुद्दा मांडला की आम्हाला छत्रपती सोबत हवे आहेत. म्हणून आम्ही पहिला प्रस्ताव सोबत ठेवतो की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा. पण या मुद्द्याला मी नकार दिला. मग मी म्हणालो की शिवसेनेची सीट आहे असं ते म्हणतात, त्यांच्याकडे कोटा नाहीये तरीही ते असं म्हणतायत, मग मी प्रस्ताव ठेवला की मला महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार घोषित करा.

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ते शक्य नाही पण मविआच्या वतीने शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला तयार आहे. तरी मी मान्य केलं नाही. म्हटलं दोघे दोन दिवस विचार करू पुन्हा भेटू. दोन दिवसानी शिवसेनेच्या मंत्र्यांचा फोन आला की आम्हाला उमेदवारी द्यायची. त्यानंतर उमेदवारीचा ड्राफ्ट तयार झाला – मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना या दोन्हीचा विचार करून मधला मार्ग काढला. आजही माझ्याकडे तो ड्राफ्ट आहे, मंत्र्यांचं हस्तलिखित, त्यांच्याकडे सगळे मेसेज माझ्याकडे आहेत.

राजे पुढे म्हणाले,सगळं शिष्टमंडळ आलं, यातील खासदारांनी मला सांगितलं की आजही मुख्यमंत्र्यांना वाटतं की शिवसेनेत या, मी म्हटलं तसं असेल तर मला पुढं जायचंच नाही. तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा ड्राफ्ट वाचू. त्यात एक शब्द होता. तो जो शब्द होता, जो बदलला, मला तो सांगायचा नाही. त्यानंतर ड्राफ्टही फायनल झाला, मग मी कोल्हापूरला गेलो, पोचल्यावर मला बातमी कळली की संजय पवार जो माझाच कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी मिळालीये. मी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना फोन केला, कोणी काहीच बोललं नाही. मुख्यमंत्र्यांनी माझा शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण मी आता स्वराज्य बांधण्यासाठी सज्ज झालोय. मी मोकळा झालोय विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी असे संभाजीराजे म्हणाले.

आपण कोणापुढे झुकून, कोणापुढे वाकून खासदारकी घेणार नाही. ही माझी माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले आणि आपण राज्यसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. या प्रकरणात घोडेबाजार सुरू आहे. या घोडेबाजारात आपल्याला जायचं नसल्याने आपण ही निवडणूक लढवत नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

Protected Content