Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठातील ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ महोत्सवाचा समारोप

जळगांव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रा’च्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ महोत्सवाचा समारोप प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी प्रा. डॉ.म.सु.पगारे हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख वक्ते योगेश शिरसाट हे उपस्थित होते. या प्रसंगी योगेश शिरसाट यांनी, “चित्रपट आणि दृश्य माध्यमातील माझा प्रवास” या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराव्दारे संवाद साधला. ते म्हणाले की, “चांगला नट किंवा दिग्दर्शक बनण्यासाठी काल्पनिकता, निरीक्षण क्षमता आणि एकाग्रता हे तीन गुण आवश्यक असतात.

प्रा.बी.व्ही.पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “‍विद्यापीठातील मराठी विभाग हा सातत्याने मराठी भाषा समृध्द करण्यासाठी नियमितपणे कार्यक्रमांचे आयोजन करीत असतेा. प्रा.म.सु.पगारे यांनी सांगितले की, “आपल्या सर्वांनाच मराठी भाषेचे जतन करायचे असून मालिका, चित्रपटासाठी मराठी भाषेत उत्कृष्ट पध्दतीने लेखन होतांना दिसत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनय सर्वांना प्रेरणा देणारा ठरत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.आशुतोष पाटील यांनी मानले.

या ऑनलाईन कार्यक्रमात खान्देशातील सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व मराठी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी प्रा.डॉ.म.सु.पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा.डॉ. आशुतोष पाटील, सहायक प्राध्यापक दीपक खरात, नेत्रा उपाध्ये, महेश सूर्यवंशी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version