Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोर समजून जमावाच्या बेदम मारहाणीत तरूणाचा मृत्यू

औरंगाबाद वृत्तसंस्था । वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामराई येथे चोरीच्या संशयावरून एका २८ वर्षीय तरुणाला पकडून मारहाण केल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

राजू पोपट शिरसाठ (रा. समता कॉलनी, वाळूज) असे त्याचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीसांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास एक फोन आला. रामराई रोडवर एका संशयित चोराला मारहाण केल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे, अशी माहिती मिळाली. यावेळी गस्तीवरील पोलिस व्ही. एस. खंडागळे, चालक विजय दारुंटे आदीच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या अनिल गिरे, रमेश गिरे, संदीप गिरे, ऋषिकेश मोहन व इतर नागरिकांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत शिरसाठ याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सकाळी सहा वाजता मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सुनील म्हस्के हे करत आहेत.

Exit mobile version