Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ वादातून तरुणावर चॉपरहल्ला, दोन जणांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोळीपेठ येथे रंगपंचमी खेळत असताना स्पिकर लावत असतांना झालेल्या वादातून तरुणावर सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे व सागर उर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (दोघ रा. कोळीपेठ, जळगाव) यांनी धारदार चॉपरने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार २५ रोजी सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक असे की, शहरातील कोळीपेठ परिसरात दीपक उर्फ भूषण अंबर सपकाळे (वय-२५) हा तरुण वास्तव्यास असून तो सेंन्ट्रिंग काम करतो. धुलीवंदनाच्या दिवशी सोमवारी २५ मार्च रोजी पावणेआठ वाजेच्या सुमारास बलभिम व्यायाम शाळेचे सदस्य राहुल अभिमान सपकाळे, पवन रविंद्र इंगळे, शुभम रविंद्र सपकाळे, सतिष दिगंबर सपकाळे यांच्यासह दहा ते पंधरा जण मिळून त्या परिसरात राहणारे नरेंद्र सपकाळे यांच्या ओट्यावर स्पिकर लावत होते. यावेळी सागर उर्फ बिडी हा त्याठिकाणी आला आणि स्पिकर लावणाऱ्या तरुणांना शिवीगाळ करीत अश्लिल बोलू लागला. त्यावर दीपक याने एकाला बोला असे म्हटल्याचा राग आल्याने तुला पाहतोच म्हणत सागर उर्फ बिडी हा दीपकच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर घरातून त्याने धारदार चॉपर घेवून त्याठिकाणी आला. बिडीचा मित्र सागर उर्फ झंपऱ्या सपकाळे हा देखील तेथे आला. सागर उर्फ बिडी सपकाळे याने दीपक उर्फ भूषण सपकाळे याच्या पोटावर चॉपरने वार केला. परंतू त्याने वार वाचविण्यासाठी हात पुढे केल्याने तो चॉपर भूषणच्या हातावर लागून तो गंभीर जखमी झाला. आरडाओरड झाल्याने दोघ हल्लेखोर तेथून पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या दीपक उर्फ भूषण याला त्याच्या मित्रांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सागर उर्फ बिडी सपकाळे व त्याचा मित्र सागर उर्फ झंपऱ्या सपकाळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, शनिपेठ पोलिसांनी दोघ संशयितांना अटक केली.

Exit mobile version