Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा तालुक्यात मिनी प्लेन कोसळले : एक ठार, एक जखमी

चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील वर्डीपासून जवळच असलेल्या रानतलाव परिसरात आज दुपारी मिनी प्लेनला झालेल्या अपघातात एक वैमानिक ठार झाला असून महिला पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, वर्डी गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असणार्‍या रानतलाव या परिसरात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मिनी प्लेन कोसळले. येथून जवळच शेतात काम करणार्‍यांना मोठा आवाज ऐकल्याने याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता वैमानिक मृत झाल्याचे दिसून आले. तर महिला पायलट जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात आणले जात आहे. हेलीकॉप्टर अपघाताची माहिती समोर येताच तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गंभीर जखमी झालेल्या महिला वैमानिकाला उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, शेतात काम करणार्‍यांना पहिल्यांदा नेमके काय झाले हे कळलेच नाही. मात्र त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मिनी प्लेनचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले. यातील वैमानिक हा जागीच ठार झाला होता, तर महिलेला जबर दुखापत झाली होती. तेथे स्ट्रेचरची व्यवस्था नसल्यामुळे झोळी करून या महिलेला खाली नेण्यात आले. हा भाग खूप उंचावर असून महिला पायलटला खाली नेतांना खूप अडचणी आल्या. अडावद येथील पत्रकार रियाज शेख यांनी याबाबत अधिक माहिती देतांना सांगितले की, अपघात झालेले ठिकाण हे दुर्गम असल्यामुळे अचूक माहिती मिळण्यासाठी विलंब होत आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार अपघात हा मिनी प्लेनचा झाला असून ते शिरपूर येथील एव्हीएशन अकॅडमीचे होते. यातील नुरूल अमीन या पायलटचा मृत्यू झाला असून अंकिता गुजर ही महिला पायलट जखमी झाली आहे.

(आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत. सविस्तर माहिती लवकरच)

Exit mobile version