Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज बिल सक्तीच्या विरोधात ‘रास्ता रोको’

चोपडा प्रतिनिधी | महावितरणतर्फे वीज बिलांची सक्ती केली जात असून याचा निषेध करण्यासाठी शेतकरी कृती समितीने रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला.

शेतकर्‍यांकडे हजारो कोटींची थकबाकी असल्यामुळे महावितरण तोट्यात असल्याचे कारण देऊन, शेतकर्‍यांना बदनाम केले जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना बनावट बिले देऊन त्यांना विजचोर ठरवणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत वीज जोडणी तोडण्याच्या मोहीमेविरुद्ध शेतकर्‍यांनी चोपडा-धरणगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यानंतर यासंदर्भात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. तर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आंदोलकांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. वीजचोरांनी चोरलेली वीज शेतकर्‍यांचे नावावर टाकून ते वसूल करण्याचे आदेश ज्यांनी दिले ते मंत्री व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. माजी आमदार दिलीप सोनवणे, गोरख पाटील, सी. एस. पाटील, धनंजय पाटील, नारायण पाटील, विकास शिर्के, विनोद चव्हाण, पुरुषोत्तम पाटील, धर्मराज पाटील आदींसह शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Exit mobile version