Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयजींच्या पथकाची कारवाई : सहा गावठी कट्टयांसह २४ काडतुसे जप्त

चोपडा प्रतिनिधी | नाशिक येथील विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तालुक्यात दोन ठिकाणी छापे मारून सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त करत तिघांना गजाआड केले आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांना चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी अवैध शस्त्रविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तालुक्यातील खार्‍या पाडाव शिवारातील उमर्टी ते वैजापूर रस्त्यावरील टेकडीजवळ सतनामसिंग महारसिंग जुनैजा (२२, रा. उमर्टी, जिल्हा बडवाणी) याच्याकडून ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल तसेच मॅगझीनसह चौदा जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. यासोबत त्याला अटक करण्यात आली आहे. दुसर्‍या छाप्यामध्ये चोपडा ते धरणगाव रोडवरील हॉटेल विश्व समोर ७५ हजार रुपये किंमतीचे तीन स्टिलचे गावठी बनावटीचे पिस्टल व दहा जिवंत काडतूस बाळगणार्‍या अक्षय महाले (वय २५, रा. चोपडा), विजय पाटील (वय ३२, रा. चोपडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर हॅप्पी उर्फ प्रवीण शिकलकर (वय ३५, रा. उमर्टी, मध्यप्रदेश) हा फरार झाला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून चौथ्या फरार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच वेळेस सहा गावठी कट्टे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version