Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनचे भारतासोबत छुपे युद्ध ; मोदींसह महत्वाच्या १० हजार भारतीयांची हेरगिरी

 

लंडन, वृत्तसंस्था । लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकही गोळी न चालवता चीनने भारताविरोधात युद्ध पुकारले असल्याचे म्हटले जात आहे. या युद्धाला ‘हायब्रिड वॉरफेअर’ म्हटले जाते. चीनने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह १० हजार व्यक्ती आणि संघटनांवर पाळत ठेवली आहे. चीनच्या या हेरगिरीमध्ये त्यांची झेन्‍हुआ डाटा इन्फॉरमेशन टेक्‍नॉलॉजी कंपनी लिमिटेड या बिग डेटा कंपनीने मदत केली आहे.

चीन सरकारशी संबंधित असलेल्या झेन्‍हुआ कंपनीने भारतातील १० हजार व्यक्ती, संघटनांची हेरगिरी केली आहे. ही कंपनी बिग डेटाचा वापर करून ‘हायब्रीड वॉरफेअर’ आणि ‘चीनच्या व्यापक प्रकल्पा’साठी काम करत आहेत. चीनच्या कंपनीने राजकारण, सरकार, व्यापार-उद्योग, तंत्रज्ञान, माध्यमे आणि नागरी चळवळीतील व्यक्ती, संघटना यांना लक्ष्य केले आहे . ती चीनच्या गुप्तचर संस्था, लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांसोबत काम करते. ही चिनी कंपनी डिजिटल जगात आपल्या लक्ष्यावर बारीक लक्ष ठेवते. दस्ताऐवज, पेटंट, नोकर भरतीची पदे आदीबाबतही माहिती ठेवली जाते.

अमेरिका, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांविषयीच्या डेटाबेस कंपनीने तयार केला असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. चीनने या कंपनीच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत, सरन्यायाधीश शरद बोबडे, भारताचे महालेखा परीक्षक, जवळपास ३५० खासदारांवरही पाळत ठेवली असल्याचे वृत्त आहे. भाजप, काँग्रेस, डाव्या पक्षांच्या निगडीत असलेल्या नेत्यांसह प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ओदिशाचे नेते नवीन पटनाईक, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, ‘आप’चे मनीष सिसोदिया आदींचा समावेश आहे.

ही चीन कंपनी एक दुसऱ्यांशी संबंधित माहितीचा डेटाबेस तयार करते . संबंधित लोकांमध्ये नेमके काय वातावरण आहे, त्यांचा कल कसा आहे, याबाबतची माहिती जमा केली जाते . यासाठी लक्ष्य असलेल्या व्यक्तीच्या पोस्टवर कोणत्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, किती लाइक्स, शेअर येत आहेत याचे विश्लेषण केले जाते. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे त्या व्यक्तीच्या भौगोलिक स्थानाचीही माहिती घेतली जाते. अशा प्रकारची माहिती जमा करण्याचा उद्देश्य घातक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Exit mobile version