Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा दौरा स्थगित

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी”साठी २६ ऑगस्ट रोजी होणारा पाचोरा दौरा तूर्त स्थगित झाला असून लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल. अशी माहिती जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील व उपजिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हानिहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील पहिला  तालुकास्तरीय “शासन आपल्या दारी” हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे.  यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, ना. अनिल पाटील यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपास्थिती लाभणार आहे. यावेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल या सह विविध विकास कामांचे देखील भूमीपूजन व उद्घाटन केले जाणार आहेत. शिवाय पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले असुन याबाबत आ. किशोर पाटील व उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी देखील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.

कोट

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कार्यव्यस्ततेमुळे २६ ऑगस्ट रोजी होणारा दौरा पुढे ढकलण्यात आला असून सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात हा दौरा होऊ शकतो. सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

– किशोर पाटील (आमदार) पाचोरा – भडगाव

Exit mobile version