Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिदंबरम यांना देश सोडण्याची मनाई : लुकआऊट नोटीस जारी

p.chidambaram 1

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात अडकलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडूनही दिलासा मिळालेला नाही. चिदंबरम यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई आता शुक्रवारी सुनावणी करणार आहेत. त्यामुळे चिदंबरम यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच ईडीनेही चिदंबरम यांना नव्याने लुकआऊट नोटीस जारी करून त्यांना भारताबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना ईडीची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

 

ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात काढलेली लुकआऊट नोटीस रस्ते परिवहन, हवाई दल आणि नौदलाला पाठवली आहे. त्यात चिदंबरम यांना ईडीच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी न देण्याचे आदेश दिले आहेत. काल सायंकाळपासून चिदंबरम यांचा कुठेच पत्ता लागलेला नाही. त्यामुळे ईडीने चिदंबरम यांचा शोध सुरू ठेवला आहे. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनी आयएनएक्स घोटाळ्यात मिळालेल्या लाचेच्या रकमेतून स्पेनमध्ये एक टेनिस क्लब आणि अमेरिकेत एक टुमदार बंगला खरेदी केला आहे. त्याशिवाय कार्तीने देश-विदेशात अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली आहे. याप्रकरणात चिदंबरम यांना ताब्यात घेऊन ईडीला त्यांची चौकशी करायची आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटकेची टांगती तलवार असलेल्या चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकलेला नाही. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी याप्रकरणी कोणतेही आदेश दिले नाहीत. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले होते. गोगोई यांनी या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Exit mobile version