Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपतींची अडवणूकच- ना. दानवे

औरंगाबाद, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी देत पाठींबा द्यावा, असे आवाहन छत्रपती संभाजीराजेनी सर्वच पक्षांना केले. परंतु शिवसेनेकडून निवडणूक लढा, म्हणजे एकप्रकारे छत्रपतींची अडवणूकच असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार असून, त्यासाठी नामांकनासाठी ३१ मे पर्यंत मुदत आहे. राज्यात भाजपचे दोन, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक असे पाच उमेदवार असून सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजेनी अर्ज भरणार असून पाठींबा द्यावा असे म्हटले होते. सहाव्या जागेचा निर्णय भाजपने केलेला नसून तो संसदीय बोर्डाच्या बैठकीत होईल. छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेना याच्यात काय चर्चा झाली हे माहित नाही, परंतु संभाजीराजेनी शिवबंधन बांधले तरच त्यांना उमेदवारी देऊ अशी  माध्यमातून माहिती मिळाली.
संभाजीराजेना निवडणुकीत न उतरविता त्यांना सन्मानाने खासदारकी द्यावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यानुसार गेल्यावेळी आम्ही त्यांना खासदार म्हणून पाठिंबा दिला. परंतु आता शिवबंधनाच्या नावाखाली संभाजीराजेना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याऐवजी त्यांना सुरक्षित जागेवर उमेदवारी द्यावी आणि सहाव्या जागेवर संजय राऊत यांना उमेदवारी द्यावी असेही ना. दानवे यांनी औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Exit mobile version