नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आपला निर्णय आपण मागे घेत असल्याची घोषणा आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यामुळे येथून शिंदेसेनेच्या लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधून छगन भुजबळ हे लढणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी स्वत: याबाबत चाचपणी करून लढण्याची तयारी केली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे स्वत: पुन्हा मैदानात उतरण्यासाठी इच्छुक होते. तसेच भाजप नेत्यांनी देखील याला विरोध केला होता. यामुळे महायुतीच्या उमेदवारीचा तिढा निर्माण झाला होता.
दरम्यान, या संदर्भात आज भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आपण येथून लढावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र संपूर्ण विचारांती आपण माघार घेत असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे येथून हेमंत गोडसे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.