Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजारी व्यक्तींनी घरी न थांबता वेळीच तपासणी करा; वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । ताप, खोकला व इतर आजाराची लक्षणे दिसली तर घरी न थांबता नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य तपासण्या कराव्यात. अन्यथा कोरोना आजार असल्यास व वेळीच निदान न झाल्यास व्यक्ती दगावण्याची शक्यता वाढली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांनी दिली आहे. 

कोरोना महामारीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित झाले आहे. त्यानुसार सुमारे ३८० रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. अत्यवस्थ व गंभीर अवस्थेत पोचलेले कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. डॉ. देवरे यांनी सांगितले की,  मास्कचा वापर, स्वच्छता राखणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीसह लसीकरणामुळे कोरोनापासून बचाव करता येतो. या सवयीचे कायम काटेकोर पालन करावे लागेल. कोरोनासदृश्य लक्षणे जाणवली तर नक्कीच जवळच्या डॉक्टरांकडे अथवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी केलीच पाहिजे. जर कोरोना आजार असल्याचे निदान झाले तर वेळीच उपचार घेता येतात. 

कोरोना तपासणी अहवाल येण्यास उशीर होत असेल तर अनेकजण अहवालाच्या प्रतीक्षेत राहून लक्षणे असतानाही उपचार घेत नाही. जर ताप, खोकला, सर्दी, थंडी वाजणे, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत असतील व कोरोना अहवाल प्रतीक्षेत अथवा निगेटिव्ह आला तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घ्यावेत. यामुळे पुढील धोका टाळता येतो. यासह नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे असेही आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांनी केले आहे.

Exit mobile version