Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चतुर्वेदींचे सौंदर्य पाहूनच मिळाली खासदारकी : शिरसाठांच्या दाव्यावरून वादंग

छत्रपती संभाजी महाराज नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रियंका चतुर्वेदी यांचे सौंदर्य पाहूनच त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आल्याचा दावा आमदार संजय शिरसाठ यांनी केल्याने यावरून वादंग सुरू झाले आहेत.

शिवसेना-उबाठा पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कालच्या पक्षाच्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार टिका केली होती. गद्दारांना माफी नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. याला प्रत्युत्तर देतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शेलक्या शब्दांचा आधार घेतला आहे.

आज संजय शिरसाठ म्हणाले की, प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असं म्हटलं. प्रियंका चतुर्वेदी खरं तर कॉंग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यावेळी अत्यंत भयानक वक्तव्य केलं होतं. खैरेंनी सांगितलं की, आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचं सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. या दाव्याने शिंदे आणि ठाकर गटात पुन्हा ठिणगी पडली आहे.

या संदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केले असून यात म्हटले आहे की, मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही. ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे. ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपाने त्यांना त्यांच्याबरोबर ठेवलं आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Exit mobile version